प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा पालिकेच्या कास धरण उद्भव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कास परिसरात 2 ते 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने संबंधित गळती काढण्याचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असून कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 26 ते 2 जानेवारी या कालावधीत शहरातील काही भागात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये सायंकाळ सत्रातील कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा परिसर तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील भागांचा समावेश आहे. तसेच सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून होणारा यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ परिसरातील तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांवर अवलंबून असलेल्या भागांमध्येही पाणीपुरवठा कमी प्रमाणात होण्याची शक्यता नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. दरम्यान, कास धरण उद्भव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होणार्या सर्व भागांतील नागरिकांनी या कालावधीत पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.