प्रभात वृत्तसेवा सातारा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यांमध्ये करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यांमध्ये करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सद्यस्थितीत स्वयंसहाय्यता गटातील महिला त्यांच्या उपजीविका रोजगारासाठी लघुउद्योग करत आहेत. या माध्यमातून विविध वस्तू आणि उत्पादनांची निर्मिती होत आहे. या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महालक्ष्मी सरस या माध्यमातून जिल्हा व विभाग स्तरावर विविध ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शन तसेच आठवडी बाजारातील स्टॉलद्वारे महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.उमेद मार्ट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील गटांची नोंदणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शासन निर्णय निर्गमीत करण्यात आले आहेत. पुणे विभागातील सातारा, पुणे, सोलापूर, कोकण विभागातील रत्नागिरी-खेड, ठाणे- अंबरनाथ, नाशिकमधील जळगाव- भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव – तुळजापूर, अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला तर नागपूर विभागातील वर्धा आणि नागपूर येथे उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.