प्रभात वृत्तसेवा पुणे – सातारा येथे होत असलेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे म्हणून संयोजन समितीच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या साहित्यिकांच्या स्मृती जागवण्यासाठी गुरुवार, दि. 1 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या निवासस्थानापासून संमेलनस्थळापर्यंत ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढली जाणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या समन्वयाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. साहित्य प्रेरणा ज्योत हा आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांमधील आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे. सातारच्या नगरवाचनालयापासून थोरले प्रतापसिंह महाराज, प्रतापसिंह हायस्कूलपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखान्यापासून अभयसिंहराजे भोसले, मर्ढे येथून कविवर्य बा. सी. मर्ढेकर, वाईतून लक्ष्मणशास्त्री जोशी, नायगाव, ता. खंडाळा येथून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले; फलटण येथून बेबीताई कांबळे आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले, कटगुण, ता. खटाव येथून महात्मा ज्योतिबा फुले, एनकूळ, ता. खटाव येथून उत्तम बंडू तुपे, रहिमतपूर, ता. कोरेगाव येथून ना. ह. आपटे, वसंत कानेटकर, कवी यशवंत, कराड येथून यशवंतराव चव्हाण, गोपाळ गणेश आगरकर, संत सखुबाई, इंदिरा संत, पाटण येथून कवी विहंग, शाहीर भाऊ फक्कड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य प्रेरणा ज्योती संमेलनस्थळी आणल्या जाणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी या ज्योतींचे स्वागत करण्यात येणार आहे. सर्व साहिय प्रेरणा ज्योती दि. 1 जानेवारी रोजी सातार्यातील शिवतीर्थावर एकत्र येऊन, छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलात संमेलनाच्या मुख्य मंडपात विराजमान होणार आहेत. दुपारी 3 वाजता संमेलनस्थळी या ज्योतींचे स्वागत संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल.या उपक्रमाविषयी गावोगावी जनजागृती होत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी कसोशीने प्रयत्नशील आहेत, अशी माहिती रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.