Satara News : पाचट पेटवताना शेजारचा ऊस पेटू लागल्याने, आग विझवण्याचा प्रयत्नात शेतकरी (Satara News)जयवंत दिनकर डुबल (वय 65, रा. मळा वॉर्ड, हजारमाची, ता. कराड) यांचा होरपळून मृत्यू झाला. हजारमाची येथील मळा वॉर्ड नावाच्या शिवारात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील डुबल कुटुंबीयांची मळा वॉर्ड नावाच्या शिवारात शेती आहे. या शेतातील उसाची काही दिवसांपूर्वी तोड झाली होती. फडातील पाचट पेटवण्यासाठी जयवंत डुबल हे बुधवारी सायंकाळी शेतात गेले होते. त्यांनी पाचट पेटवले. त्याच वेळी वार्याने आगीची झळ शेजारच्या उसाला लागली. ऊस पेटू लागल्याने, डुबल यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाय अडखळून ते पडले. त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. वाळलेली पाचट आणि कपड्यांना लागलेल्या आगीमुळे काही क्षणातच जयवंत डुबल हे गंभीररित्या भाजले. ही घटना निदर्शनास येताच परिसरातील शेतकर्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी बचाव करेपर्यंत डुबल यांचा होरपळून मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.