प्रभात वृत्तसेवा पाचगणी – राज्यात सध्या सुरु असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे ग्रामीण भागाला भिडत असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नवी मुबंई महानगरपालिकेसाठी मंत्री गणेश नाईक यांना साथ करण्याचे जाहीर आवाहन आंबेघर येथील मेळाव्यात मुंबईस्थित जावळीवासियांना केले.जावळी तालुक्यात शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात राजकीय उलथापालथ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर दुसरीकडे मेढा नगरपंचायतीच्या स्थानिक निवडणुकीत शिवसेनेचे ५ नगरसेवक निवडून आणले आहेत. या सर्व घडामोडी नवी मुंबईचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अकुंश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. अकुंश कदम जावळी तालुक्यातील असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ते ओळखले जातात. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला मनसुबा जाहीर करत नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांना ताकदीने मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईस्थित जावळीकरांच्या मताचा गठ्ठा खेचून आणण्याकरीता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे.मुंबई येथे मंत्री गणेश नाईक व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचा भाजप प्रवेश होणार आहे. या प्रवेशाने नवी मुंबईत जावळीकरांच मतदान देखील खेचून आणण्यात भाजपला सपकाळ यांची मदत होणार असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राजकीय गट सक्रिय असून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर पकड मजबूत असल्याचे बोलले जात आहे. नवीन मुबंईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ताकदीने उतरणार असल्याने जावळीत नव्याने उदयास आलेल्या अकुंश कदम यांची चांगलीच गोची झाली आहे. सुरवात तुम्ही केली… राजकीय जीवनाच्या प्रवासात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमी आपला मतदारसंघ सोडून इतरत्र हस्तक्षेप करणे कटाक्षाने टाळतात, असे मानले जाते. मात्र, आपल्या हक्काच्या मतदारसंघात कोणी ढवळाढवळ केली तर शिवेद्रसिंहराजे सोडत नाहीत. मेढा येथील निवडणुकीतील अंकुश कदम यांची ढवळाढवळ लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेतील निवडणुकीसाठी घेतलेला पवित्रा म्हणजे ‘सुरवात तुम्ही केलीत.. आता शेवटआम्ही करु,’ असा इशाराच जणू शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.