प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्यात नाशिक, पुणे, अहिल्यानगर येथे बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत. तर सातारा जिल्ह्यामध्ये मानव व बिबट्या यांच्यातील संघर्ष दाट झाला आहे. या गोष्टी लक्षात घेऊन बिबट्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘मागेल त्याला पिंजरा’ हे धोरण स्वीकारल्याचे उत्तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिले. त्यामुळे पिंजरा लावण्याची क्लिष्ट प्रक्रिया टाळून जलद गतीने ही व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांच्यासह 55 आमदारांनी बिबट्या आणि त्याचे होणारे हल्ले यासंदर्भात लक्षवेधी केली होती. भटकी कुत्री आणि बिबट्यांचे राज्यातील वाढते हल्ले यावरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवारचा दिवस जोरदार गाजला. ज्या जिल्ह्यातून मागणी येईल त्या जिल्ह्याला तात्काळ (केंद्र) उपलब्ध करून दिले जातील, असे उत्तर गणेश नाईक यांनी दिले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बिबट्यांची गणती अद्याप झालेली नाही. मात्र, जिल्ह्यात किमान 50 पेक्षा अधिक बिबटे असावेत असा अंदाज आहे. सातारा शहरात काही दिवसांपूर्वी सापडलेला बिबट मादीचा बछडा पुणे बावधन येथील रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आला. सातारा वन विभागाने रॅपिड रेस्क्यू पथक आणि विशिष्ट रसायनाचे ॲनिमल आऊट द्रावण फवारण्याचे धोरण स्वीकारले असून त्याला काही ठिकाणी यश येत आहे. पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याने थेट मानवावर हल्ला केल्याने येथील वातावरण संवेदनशील बनले आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात सूचना दिल्या असून वन विभागाला सुद्धा तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आवश्यक ठिकाणी विशेषतः पाटण, ढेबेवाडी तसेच सातारा व जावळी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागामध्ये ट्रॅप कॅमेरे तसेच थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्यांच्या परिभ्रमण मार्गाचा अंदाज घेतला जाणार आहे व ठराविक जागांवर पिंजऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. जुन्नरच्या धर्तीवर बिबट्यांसाठी बचाव केंद्र सुरू करण्यात आले असून त्याची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीच्या पुनर्वसन केंद्राची अद्ययावत स्वरूपात मागणी पुन्हा एकदा करण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्यांवर लक्ष ठेवून त्याच्या हालचालीची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नियंत्रण करण्याच्या राज्य शासनाच्या हालचाली आहेत. तशी यंत्रणा सातारा जिल्ह्यातही उपलब्ध होऊन बिबट्याच्या आगमनाची पूर्वसूचना मिळू शकेल अशी व्यवस्था अस्तित्वात आणणे गरजेचे आहे.पाटण, जावळी, सातारा या तीन डोंगरी तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळा बदलाव्यात अशी सुद्धा मागणी होत आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी रॅपिड ॲक्शनं फोर्सबरोबर महसूल विभागाची पथके तयार करणे, स्थानिक तरुणांना त्या माध्यमातून रोजगार संधीच्या दृष्टीने सहभागी करून घेणे, जंगलातच वन्यजीवांना खाद्य मिळावे यासाठी प्रयत्न करणे, जंगलाच्या सीमेवर बांबूचे अथवा तारेचे कुंपण यासारख्या उपाययोजनांची गरज आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.