प्रभात वृत्तसेवा कराड – केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी आ. मनोज घोरपडे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी उंब्रज येथील महामार्गाचा उड्डाणपूल मंजूर केल्याबद्दल सुप्रसिद्ध सातारी कंदी पेढे देऊन त्यांचे आभार मानले.पुणे-बंगळूरू महामार्गावर उंब्रज येथे भराव पुलाऐवजी पारदर्शक पुलाची मागणी सातत्याने जोर धरत होती. पावसाळी अधिवेशनामध्ये आ. मनोज घोरपडे यांनी उंब्रज येथे पारदर्शक उड्डाणपुलाचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. अधिवेशन काळामध्ये ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन उंब्रज पारदर्शक उड्डाणपूला विषयी आग्रही मागणी केली.ना. गडकरी यांच्या सूचनेनुसार त्यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी उंब्रज येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. योग्य प्रस्ताव तयार करून आ. मनोजदादा घोरपडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने उंब्रज उड्डाणपुलाची मागणी यशस्वी झाली या उड्डाणपूलाचे टेंडर निघाले आहे. त्या औचित्याने नागपूर येथे ना. गडकरी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले.उंब्रज उड्डाणपुलाचे काम लवकर आणि दर्जेदार करणार असून कोणत्याही जागेचं अतिरिक्त भूसंपादन केले जाणार नसल्याची ग्वाही ना. नितीन गडकरी यांनी दिली. कराड उत्तरेतील वेणेगाव ते कोपर्डे हा कृष्णा नदीवरील पुल काशिळ ते कोपर्डे येथील कृष्णा उरमोडी नदीच्या संगमावरील पुलास निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या काळात कराड उत्तर मधील रस्ते सीआयआरएफ मधून काँक्रीट रोड करण्याचा आराखडा तयार केला असून त्यासाठीही निधीची मागणी आ. मनोज घोरपडे यांनी केली.