प्रभात वृत्तसेवा नागठाणे – मतदारसंघातील गोरगरीब,गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा मोफत मिळाव्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या प्रकारचे उपचार मिळावेत, यासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.नागठाणे (ता. सातारा) येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, वेळ पडली तर अधिवेशनात हा विषय मांडू, असे त्यांनी सांगितले. नागठाणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगाडे, डॉ. अश्विनी महालकर व त्यांचे सहकारी नेहमीच चांगली रुग्णसेवा करत असल्याचाही उल्लेख आ. घोरपडे यांनी आवर्जून केला. यापुढे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी हॉस्पिटलपेक्षा जास्त दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग नेहमीच प्रयत्नशील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले. अशा प्रकारचा उपक्रम जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात राबविणार असल्याचे सांगितले. काजल ढाणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, खटाव माण कारखाना संचालक विक्रम घोरपडे, डॉ. महेश जगाडे, डॉ. अश्विनी महालकर, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा भरते, निखिल केंजळे, विजया गुरव, राजेंद्र ढाणे, सर्व आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.