प्रभात वृत्तसेवा कृष्णानगर – अनेक छोटे-मोठे अपघात, वाहनांचे नुकसान व जीवितहानी झाल्यानंतर दैनिक प्रभात ने वारंवार धारेवर धरल्याने सुस्त मेघा इंजिनियरींग कंपनीला जाग येवून सातारा-लातूर महामार्गावरील पाणी गळती नंतरच्या खडडे क्राँक्रीटीकरणाला मुहूर्त मिळाला आहे.अर्धवट सोडलेली, निकृष्ट दर्जाची कामे, अधिकार्यांची अनुपस्थिती तसेच कंपनीच्या स्थायी कार्यालयाचा अभाव, सरकारी आदेशाचे उल्लंघन अशा विविध कारणांनी चर्चेत असलेल्या मेघा इंजिनियरींग कंपनी विरुद्ध जनतेने अनेकवेळा आंदोलन केली. जिल्हाधिकारी, खासदार, स्थानिक आमदार यांना वेळोवेळी निवेदन देवून काम सुरू करण्याची विनंती केली. परंतू याचा काही परिणाम झाला नाही. अद्यापही स्ट्रीट लाईट, रस्त्यातील महावितरणचे खांब हटवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिगत पाईप लाईन रस्त्याच्या कडेला टाकणे, मुख्य रस्त्यालगत गटरे काढणे, कॅनॉलवरील पूल बांधणे अशी अनेक कामे खोळंबली असून आगामी काळातही ही कामे सुरू होतील की नाही, ही शंकाच आहे. नुकताच संगमनगर येथे उसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर दै. प्रभातने या प्रकरणाला वाचा फोडताच या मार्गावरील जलवाहिनी दुरुस्तीनंतर झालेल्या खड्ड्यांच्या क्राँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू झाल्याने दुचाकीस्वारांना दिलासा मिळाला आहे. या निकृष्ट कामामुळे युवतीचा बळी गेल्यानंतर कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नागरीकांनी आंदोलन केले. परंतू मुजोर कंपनीसाठी भ्रष्ट शासनकर्त्यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून चोर सोडून संन्याशाला फाशी, असा अन्याय केल्याची खंत नागरीकांनी व्यक्त केली आहे.