प्रभात वृत्तसेवा सातारा – आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले. कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाहप्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात झालेल्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध खात्याचे आजी माजी मंत्री महोदय, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.विवाह सोहळ्या संपन्न झाल्यानंतर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नव वधू आणि वराच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. जो लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून वापरला जाणार आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. लग्नासारख्या कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विवाह सोहळ्यामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. या सर्वांसमोर भोसले यांनी केलेली ही मदत सामाजिक उत्तरदायित्वाची आणि नेतृत्वाची प्रखर जाणीव करून देणारी आहे. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.