प्रभात वृत्तसेवा सातारा – डिसेंबर महिना सुरु झाला की, सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाच्या स्वागताचे वेध लागतात. यंदा मात्र सातारा जिल्ह्यात 31 नव्हे 21 डिसेंबरला जल्लोष होणार आहे. कारण सातारा नगरपालिकेसह जिल्ह्यातील दहा पालिकांच्या निवडणुकीच्या निकालादिवशी अनेकांनी गुलाल उधळायची तयार केली आहे. त्यासाठी अवघे आठ दिवस उरले असल्यामुळे सर्व जणच दि. 21 डिसेंबरची वाट पाहत आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरऐवजी चर्चा आहे ती २१ डिसेंबरचीच.जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे सगळ्या वातावरण राजकीय रंग चढला होता. दि. 2 डिसेंबरला मतदान झाले. 3 डिसेंबरला निकाल लागणार होता. मात्र, निवडणूक आयोगाने महाबळेश्वर, फलटण, या नगरपालिकांसह काही पालिकांच्या निवडणुका दि. 20 डिसेंबरला पुढे ढकलल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यामुळे जिल्ह्यातील सर्वच पालिकेचा निकाल दि. 3 ऐवजी दि. 21 डिसेंबरला लागणार हे निवडणूक आयोगाने जाहीर करताच अनेकांना धक्का बसला. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत टीकांचा झोड सुरु झाला. तर उमेदवारांना चांगलाच घाम फुटला. कार्यकर्ते, स्टार प्रचारक चांगलेच शांत झाले. अनेकांना हा निर्णय अमान्य असताना तो स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही.सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांपेक्षा विरोधी पक्षातील उमेदवार, अपक्ष यांनी निकालाबाबत साशंकता व्यक्त केली. राजकीय वातावरणात पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाली. जसे जसे दिवस जातील तसे दि. 21 डिसेंबर ही एकच तारीख सर्वांच्या डोळ्यापुढे दिसत आहे. आता निकालाला फक्त आठ दिवस उरले आहेत. ज्यांना विश्वास आहे की, मीच निवडून येणार त्यांनी जल्लोष करण्याच्या हालचाली सूरु केल्या आहेत. फटाके आणून ठेवले आहेत, विजयी मिरवणूका काढणार आहेत. बॅनर लावण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी पार्टीचे नियोजन केले आहेत. काहींनी तर हॉटेल मालकांना तारीख आणि वेळ निश्चित करण्यास सांगितले आहे. यामुळे यंदा 31 डिसेंबर दि. 21 डिसेंबरलाच वर्षाखेर साजरी होणार असल्याने व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याचीही चर्चा आहे. इव्हीएम मशीनकडे लक्ष… निवडणुकीत इव्हीएम मशीन नको म्हणत अनेकांनी विरोध केला. परंतु, इव्हीएम मशीन पूर्णतः सुरक्षित असल्याची हमी निवडणूक आयोगाने दिली. परंतु, 3 डिसेंबरचा निकाल 21 डिसेंबरला लागणार हे कळताच अनेकांनी इव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत. तिथे निकाल लागेपर्यंत आम्ही जाऊन राहतो, अशी मागणी उमेदवारांनी केली. परंतु, या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने कोणीही प्रवेश करु शकत नाहीत, असे जिल्हा प्रशासानाकडून सांगण्यात आले आहे.