प्रभात वृत्तसेवा सातारा – बोरगाव (ता. सातारा) येथील एका खासगी डेअरीकडून दूध पुरवठ्याचे बिल थकित ठेवल्याने जिल्ह्यातील दूध संकलक व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. यासंदर्भात बाधित दूध संकलकांनी लेखी तक्रार अर्ज सादर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तक्रार अर्जानुसार, अर्जदार पाच ते दहा वाड्यांमधून सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून या मिल्क डेअरीला नियमित पुरवठा करत होते. सुरुवातीच्या काळात दुधाचे बिल वेळेत मिळत होते. मात्र, १ ऑगस्ट ते २० ऑक्टोबर २०२३ तसेच १ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२४ या कालावधीत पुरवठा केलेल्या दुधाचे बिल अद्याप देण्यात आलेले नाही. वारंवार प्रत्यक्ष भेटी व फोनद्वारे मागणी करूनही डेअरी व्यवस्थापनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली. ‘कंपनी अडचणीत आहे, लवकरच पैसे देतो,’ असे सांगत वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या. मात्र, दि. १६ डिसेंबरअखेर एकही रुपया अदा करण्यात आलेला नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. यामुळे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांकडून रोज पैशाची मागणी होत असून संकलक व शेतकरी यांच्यात वाद वाढत आहेत. मानसिक तणाव असह्य झाला असून जीवास धोका निर्माण झाला आहे, अशी बाब अर्जात नमूद करण्यात आली आहे. या परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित डेअरी जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वी २१ मे २०२४ रोजीही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे. आता मात्र ७ दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन अथवा बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकित रकमेचा एकूण आकडा तब्बल २८ लाख २ हजार ४२९ इतका असून अनेक दूध उत्पादक व संकलक या प्रकरणात बाधित झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित डेअरीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी दूध संकलक व उत्पादकांकडून करण्यात येत आहे.