Satara Municipal Council – उपनगराध्यक्ष निवडीमध्ये खा. उदयनराजे यांचे धक्कातंत्र अनुभवल्यानंतर आता सातारा पालिकेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. येथे सुद्धा दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय चुरस असून या निवडीमध्ये नव्या-जुन्यांचा समन्वय ठेवला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या चार दिवसांमध्ये सभापती निवडीच्या संदर्भातील सभेचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असा अंदाज आहे. पालिकेमध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, नियोजन, शिक्षण मंडळ, महिला व बालकल्याण, तसेच मागासवर्गीय समाज कल्याण विशेष समिती या समित्यांचे सभापती निवडण्यासंदर्भात लवकरच सातारा पालिकेची पुढील बैठक होणार आहे. जिल्हाधिकार्यांसह महसूल विभाग हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे याबाबतच्या सभा बोलावण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांनी पालिका मुख्याधिकार्यांना बहाल केलेले आहेत. सभापती निवडीनंतर स्थायी समिती अस्तित्वात येणार असून स्थायी समितीच्या प्रशासक अंदाजपत्रकीय सभा आणि त्यानंतर त्या अंदाजपत्रकाचे सर्वसाधारण सभेसमोर करावयाचे सादरीकरण हा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे सभापती निवडून लवकरात लवकरच स्थायी समिती अस्तित्वात आणणे गरजेचे आहे.सभापती निवडीमध्ये दोन्ही नेत्यांकडे इच्छुकांची जोरदार फिल्डिंग लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे जे 41 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी दहा टक्के नगरसेवक अनुभवी असून सुमारे वीस पेक्षा अधिक नगरसेवक नवे आहेत. उदयनराजे भोसले – शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यामुळे सभापती निवडीत अनुभवी आणि नवे चेहरे असा समन्वय खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ठेवावा लागणार आहे. भाजपच्या गटनेतेपदी अविनाश कदम, तर पक्षप्रतोद पदी एडवोकेट निशांत पाटील यांच्या निवडी झाल्या आहेत. या निवडीमध्येसुद्धा एक खासदार गटाचा, एक आमदार गटाचा असा समन्वय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडीमध्ये सुद्धा तीन तीन सभापती पदे दोन्ही गटांमध्ये वाटून घेतली जातील असा अंदाज आहे. मात्र उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्र आणि नव्या चेहर्यांसह अपक्षांना संधी देण्याचा कल यामुळे कदाचित निवडून आलेल्या नऊ अपक्षांमधील नव्या चेहर्याला सुद्धा संधी दिले जाण्याचे धक्कातंत्र उदयनराजे अंमलात आणू शकतात. निवडून आलेल्या अपक्ष चेहर्यांमध्ये सहा नगरसेवक उदयनराजे समर्थक मानले जातात. त्यामुळे नवीन चेहर्यांना संधी मिळेल, अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. लवकरच सभापती निवडीचा अजेंडा मुख्याधिकारी अभिजीत बापट जाहीर करतील. नऊ वर्षानंतर सादर होणार बजेट सभापती निवडी आणि त्यानंतरच्या बजेटच्या हालचाली लक्षात घेऊन प्रशासन आता कामाला लागले आहे. गेल्या चार वर्षापासून प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यामार्फतच बजेट सादर केले जात होते. गतवर्षीचे प्रशासकीय बजेट 645 कोटी रुपयांचे होते. तब्बल नऊ वर्षानंतर आता सर्वसाधारण सभेपुढे उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर हे नगरपालिकेचे पुढील बजेट सादर करतील, असा अंदाज आहे. यंदाचे बजेट साडेसहाशे कोटींंचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे.