प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला असून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या जाणार आहेत. याशिवाय स्थायी समिती सदस्य संख्या आणि उपनगराध्यक्षांना कोणत्या समितीचे सभापतीपद द्यावयाचे या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. खासदार गटाला येत्या आठ दिवसांमध्ये उपनगराध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा लागणार असून इच्छुकांचा निवडीसाठी मोर्चे बांधणीला आता वेग आला आहे. सातारा पालिका पहिली सर्वसाधारण सभा केव्हा घेणार याकडे राजकीय वर्तुळाची लक्ष लागले होते. गॅझेट प्रसिद्धीनंतर तब्बल 22 दिवसानंतर सर्वसाधारण सभेचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये महत्त्वपूर्ण चार विषयांना स्थान देण्यात आले आहे. सभासचिव वर्षा पाटील यांनी हा अजेंडा नगराध्यक्षांच्या सहीसाठी पाठवला होता. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी यावर स्वाक्षरी करून दि. 22 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीची सभा बोलवली आहे. सकाळी 12 वाजता इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज दाखल करणे, दुपारी साडेबारापर्यंत छाननी त्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ आणि दुपारी एक वाजता उपनगराध्यक्ष निवड हे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज मुख्याधिकारी प्रभारी अभिजीत बापट यांच्याकडे दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम घेतला जाणार असून त्याची तांत्रिक प्रक्रिया सर्वसाधारण सभेच्या कालावधीमध्ये पूर्ण करावयाची आहे. पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष या निवडी जाहीर करणार आहेत.याशिवाय सातारा पालिकेच्या सहा विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्चित करणे महत्त्वाचे आहे. एकूण नगरसेवकांच्या जागांच्या तुलनेमध्ये एक तृतीयांश पेक्षा जास्त आणि दोन तृतीयांश पेक्षा कमी अशा पद्धतीने या सदस्य निवडी करावयाच्या आहेत .या सदस्य निवडीत 13 पेक्षा जास्त आणि 17 पेक्षा कमी असणार आहेत. ही सदस्य संख्या चर्चेनुसार निश्चित होणार आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी मोर्चे बांधणी पाच स्वीकृत सदस्य सातारा पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत निवडावयाचे आहेत. यामध्ये दोन्ही आघाड्यांचे नेते खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये अनेक उत्साही नवे चेहरे तसेच काही मतांनी लढत गमावलेले जुने, अनुभवी चेहरे यांना समान संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.