Satara: सातारा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी कोठेही नाही, त्याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. ज्या राजकीय घडामोडी आहेत, त्या व्यवस्थित सुरू आहेत; परंतु मी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकलो नाही, याबाबत नाराज आहे, असे मिश्किल वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी केले. नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 12 मध्ये खासदार उदयनराजे यांनी पत्नी सौ. दमयंतीराजे भोसले यांच्यासह अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठून, बोलते केले. उदयनराजे म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सातारा शहर आणि जिल्ह्यात सर्व उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती करून, विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्र झालेली विकासकामे बघून, लोक भाजपच्या उमेदवारांना विजयी करतील, असा माझा विश्वास आहे. सातारा पालिका निवडणुकीच्या प्रचारातील अनुपस्थितीबाबत विचारले असता, ते म्हणाले, प्रचार प्रक्रियेतील सर्व गोष्टी आमचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करूनच झाल्या आहेत. आता आम्ही आघाडी म्हणून नव्हे, तर भारतीय जनता पक्ष म्हणून एकत्र आहोत. सातारकर पहिल्यांदाच पक्षीय पातळीवरील निवडणूक पाहत आहेत. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही; परंतु नगराध्यक्षपदासाठी फॉर्म मलाच भरायचा होता. मलाच नगराध्यक्ष व्हायचे होते. मात्र, वेळेअभावी मी ते करू शकलो नाही. बंडखोर उमेदवारांबाबत उदयनराजे म्हणाले, जागा मर्यादित होत्या, तर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक फार होते. याची सांगड घालणे अत्यंत अवघड काम होते. अपक्षांना आम्ही सबुरीचा सल्ला दिला होता. ज्यांनी माघार घेतली, ते कौतुकास पात्र आहेत; परंतु काही महत्त्वाकांक्षी लोकांनी बंडखोरी केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होतील.