Satara Election – जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जावळी तालुक्यात तीन गट आणि सहा गणांसाठी सरासरी 55 टक्के मतदान झाले. मतदानाची घटलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची ठरणार, याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत उद्या, दि. 9 रोजी मतमोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात येणार आहे.जावळी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तीन गटांसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सरासरी 55 टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी घटल्याने उमेदवारांची धडधड वाढली आहे. तालुक्यात 46,437 पुरुष आणि 45,562 महिला, असे एकूण 92001 मतदार आहेत. म्हसवे गटात 29,038, कुडाळ गटात 33,085 तर कुसुंबी गटात 29,878 मतदार आहेत. खर्शी बारामुरे गणात 13,527, म्हसवे गणात 15,511, कुडाळ गणात 14,739, सायगाव गणात 18,346, आंबेघर तर्फ मेढा गणात 14,878, तर कुसुंबी गणात 15,000 मतदार आहेत. तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी (दोन्ही गट), मनसे अशी सर्वपक्षीय युती विरुद्ध भाजप अशी लढत झाली. सकाळपासून मतदानाची गती संथ होती. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासांत 6 टक्के, 11.30 पर्यंत 18 टक्के, दुपारी 1.30 पर्यंत 35 टक्के आणि 3.30 पर्यंत 46 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग काहीसा वाढून, 5.30 पर्यंत सरासरी 55 टक्के मतदान झाले. आंबेघर तर्फ मेढा गणात सर्वाधिक, तर सायगाव गणात सर्वात कमी मतदान झाले. जावळीतील बहुतांश मतदार मुंबईत वास्तव्यास असून, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या मतदारांसाठी वाहनांची सोय केली होती. त्यामुळे मतदान वाढण्यास मदत झाली. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी सकाळपासून मतदान केंद्रांना भेटी देत होते. कार्यकर्त्यांना सूचना देऊन, अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्रवीण मुदगल हे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. सपोनि सुधीर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.