प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 5 (ब) साठी दि. 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार निलेश मोरे यांनी दाखल केली असून, भ्रष्टाचार, धमकावणे, हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे ही निवडणूक रद्द ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका अॅड. तृणाल टोणपे, अॅड. निकिता आनंदाचे, अॅड. गौतम कुलकर्णी, अॅड. अनिरुद्ध रोटे, वैभव राऊत आणि रोहिणी सिदाम यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार, प्रतिवादी विजय शिवाजी देसाई (भाजप उमेदवार) व त्यांच्या समर्थकांच्या कृत्यांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली. मतदानाच्या दिवशी धंदे प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) मतदान केंद्र व रिमांड होम मतदान केंद्रासह विविध ठिकाणी मतदार मतदान केंद्रात भाजपचे कमळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या बेकायदेशीररीत्या घेऊन जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत वारंवार हरकती घेतल्या असतानाही बूथ प्रमुखांनी हरकती नोंदविल्या नाहीत किंवा कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप आहे. भाजप समर्थक मतदान केंद्रात मुक्तपणे ये-जा करत होते, तसेच अन्नपदार्थांचे वाटप करत होते. हे सर्व आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.याचिकाकर्त्यांचे समर्थक महेश शिवदास यांना 40 ते 50 लोकांनी घेरत रिमांड होम मतदान केंद्राजवळील परिसरात धमकी, शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. तरीही संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. याचिकाकर्त्यांनी निवडणूक अधिकार्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप केले आहेत.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, 1965, आदर्श आचारसंहिता अंतर्गत विविध तरतुदींच्या उल्लंघनाचा आधार घेत, प्रभाग क्रमांक 5 (ब) मधील निवडणूक अवैध ठरवून ती रद्द करावी व या प्रभागासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या आगामी सुनावणीकडे राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.याचिकाकर्ते निलेश मोरे यांनी सांगितले, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, सातारा यांना पत्र पाठवून घटनेबाबत स्वयंस्पष्ट व सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.