Satara Election – राष्ट्रवादी काँग्रेसला मत हीच खरी अजितदादांना श्रध्दांजली ठरणार आहे. त्यामुळे औंध भागातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे रहावे, असे भावनिक आवाहन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले. तर औंध ,कुरोली भागातील जनता हेच आमचे कुटुंब आहे अशा भावना श्रीमंत हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांनी व्यक्त केल्या व यावेळी अनेक आठवणींना उजाळा दिला. औंध,सि.कुरोली ,वरुड येथे आयोजित सांगता कोपरा सभांमध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी औंध जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मनिषाताई फडतरे, शुभम शिंदे, मनोज देशमुख, चारुशीला राजे पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने व विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुढे म्हणाल्या, औंधसह परिसरातील गावातील जनता हेच माझे कुटुंब आहे. मागील पंचवीस वर्षे या भागातील जनतेने मला कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने सहकार्य केले आहे. यापुढील काळात माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझ्या मुली औंध भागातील जनतेच्या अडी अडचणी समस्या सोडविण्यावर भर देणार आहोत. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून विकासकामे करणे हेच माझे ध्येय राहणार आहे. औंध भागातील जनतेने माझ्यासह राजघराण्यावर केलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. अनेक चांगल्या वाईट काळात औंध भागातील जनतेने आम्हाला साथ दिली आहे.त्यातून उतराई होण्यासाठी यापुढे तन मन धन अर्पण करून काम करणार आहे. मनिषाताई फडतरे म्हणाल्या, औंध भागातील जनता कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी उभी राहिली आहे.यावेळी विक्रमी मतदान करुन जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून द्यावी.शुभम शिंदे म्हणाले, यावेळी औंध भागातील जनता निश्चितच आमच्या पाठीशी उभी राहिली यात कोणतीही शंका नाही तरी कार्यकर्त्यांनी जागरुक पणे मतदान बाहेर काढावे असे आवाहन त्यांनी केले. मनोज देशमुख यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून कुरोली गावचा व भागाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी या भागातील जनतेने यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस झुकते माप द्यावे .यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.