प्रभात वृत्तसेवा कोरेगाव – सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीचे सचिव मनोज नाथा पानसकर यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गीता अच्युत पवार (रा. आरफळ) यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. मनोज पानसकर यशवंत औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. सोसायटीच्या सदस्य व संचालक असलेल्या गीता अच्युत पवार या दि. ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नितीन अर्जुन फाळके यांच्यासह पानसकर यांच्या वर्क्स शॉपमध्ये आल्या. यावेळी त्यांनी “मी थकीत नाही व मला प्लॉटवर कर्ज काढण्यास संस्थेची हरकत नाही” असा दोन ओळींचा दाखला तात्काळ देण्याची मागणी केली.यावर पानसकर यांनी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक घेऊन अधिकृतरीत्या दाखला देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, यावर संतप्त होत गीता पवार यांनी आजच दाखला दिला नाही तर मी तुला सोडणार नाही, माझी माणसे घेऊन तुझ्या घरी येईन व तुला जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता पानसकर हे सातारा येथील कॉलेजमध्ये मुलीला आणण्यासाठी गेले असता, गीता पवार यांनी त्यांच्या मोबाइलवरून पानसकर यांना पुन्हा एकदा रात्री घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरून मनोज पानसकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.