प्रभात वृत्तसेवा सातारा – उंब्रज ते सातारा दुचाकी वरुन येणाऱ्या पती-पत्नीला चारचाकी गाडी आडवी मारुन चौघांनी लुटले आहे. पत्नीजवळ असलेले दागिने व रोख रक्कम असा 84 हजारांचा मुद्देमाल काढुन अज्ञातांनी पोबारा केला. याप्रकरणी सुषमा अनिल बाबर(वय 45, रा. संभाजीनगर सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुषमा बाबर व त्याचे पती अनिल हे गुरुवारी रात्री दुचाकीवरुन उंब्रज वरुन साताऱ्याच्या दिशेने येत होते. त्यांच्या पाठीमागून अल्टो गाडी येत होती. सातारच्या हद्दीत येताच या गाडीचालकाने त्यांना हात दाखवून दुचाकी थांबवली. तोच चौघे गाडीतून उतरले. त्यांनी पुण्याला कसे जायचे आहे. अशी विचारणा केली. अनिल बाबर रस्ता सांगत असताना एकाने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली, तर दोघांनी सुषमा यांच्या गळ्यातील बोरमाळ, सोन्याचे गंठण, कर्णफुल वेल, बुगड्या, छोटे मंगळसुत्र, दीड हजार रुपये रोख रक्कम असा 84 हजारांचा मुद्देमाल व कागदपत्रे काढून घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दाम्पत्य घाबरले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.