प्रभात वृत्तसेवा सातारा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर हॉटेल फर्नसमोर टॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने सारिका दीपक सुतार (वय 27, रा. संगम माहुली, ता. सातारा) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारिका सुतार या दुचाकीवरून गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास क्लासला निघाल्या होत्या. त्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावरुन जात असताना, समोरून टॅक्टर-ट्रॉली आली. त्यामुळे सारिका या दुचाकी वळवून पुढे जात असताना, चाक घसरून त्या खाली पडल्या. त्यावेळी ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती मिळाल्यावर सातारा शहर पोलिसांनी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सायंकाळी उशिरा सारिका यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत. सारिका सुतार यांच्या पश्चात पती, चार वर्षांची मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.