प्रभात वृत्तसेवा कराड – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या ‘टी7-एस2’ या दुसर्या वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणातून जंगलात मुक्त करण्यात आली.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून या दोन वर्षांच्या वाघिणीला सोमवारी (दि. 8) सायंकाळी सुरक्षितरित्या पकडण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि रॅपिड रेस्क्यू टीमने केलेल्या तपासणीत ही वाघीण पूर्ण तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे स्पष्ट झाले. सॉफ्ट रीलिज पद्धतीत, वाघीण सुरक्षित कुंपणात राहून, तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. त्यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्वसन, नैसर्गिक हालचाली व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते. भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्वीरित्या राबविली जात आहे. वैज्ञानिक डॉ. के. रमेश, फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील हे वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून केले जात आहे. या मोहिमेवर ‘प्रोजेक्ट टायगर’चे सहाय्यक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे व मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे हे विशेष लक्ष देत आहेत. ‘टी7-एस2’ ही वाघीण तरुण, सशक्त व नैसर्गिकरित्या भ्रमणशील मादी आहे. ती स्थलांतरासाठी सर्वार्थाने योग्य आहे. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी वाघीण असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील व्याघ्र संवर्धनास अधिक बळकटी देईल. – डॉ. प्रभुनाथ शुक्ला, आयएफएस क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प “‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबामधून आलेल्या दुसर्या वाघिणीचे सॉफ्ट रीलिज हा सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्वसन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही वाघीण निरोगी असून, तिला आवश्यक असलेला सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा चांदोली परिसरात उपलब्ध आहे. आमची क्षेत्रीय पथके व शास्त्रीय तज्ज्ञ संस्था तिच्या सातत्यपूर्ण देखरेखीसाठी सज्ज आहेत.” – तुषार चव्हाण, आयएफएस क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प “ताडोबा आणि सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनामधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील व्याघ्र संवर्धन चळवळ अधिक भक्कम होत आहे. दुसर्या वाघिणीचे यशस्वी पुनर्वसन हे आमच्या क्षेत्रीय कर्मचार्यांच्या कौशल्याचे व समर्पणाचे प्रतीक आहे.” – एम. श्रीनिवास रेड्डी, आयएफएस प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)