सातारा : मराठी भाषेसंदर्भात गाफिल राहू नका. मायमराठीच्या अस्तित्त्वासाठी, मराठी संस्कृतीसाठी आणि मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी रस्त्यावरील लढाई खेळायला तयार आहोत, असा निर्धार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संमेलनाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला. माझंच खरं असे वागणाऱ्या जातीधर्मामुळे तयार झालेले असहिष्णुतेचे वातावरण चिंताजनक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तुडुंब गर्दीत संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी पाटील बोलत होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, स्वागताध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. रघुवीर चौधरी तसेच विश्वास पाटील यांचे भाषण होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व भाषामंत्री उदय सामंत यांची भ।षणे झाली. भाषणानंतर ते निघून गेले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई व इतर प्रमुखही निघून गेले. साताऱ्याच्या वैभवात भर टाकणारे असे हे संमेलन झाले, असे सांगून विश्वास पाटील म्हणाले, ‘‘हा काळ खूप कसोटीचा होता. ज्या भूमीवर तोफांचे गोळे पडले तिथे शाईचे गोळे पडले मात्र, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे शांततेत व संयमाने वागले.’’ मराठी भाषा आपल्या वापरात आवर्जून राहिल याचा कटाक्ष मराठी माणसाने पाळला पाहिजे. आपण साहित्यिक आणि सहिष्णू पद्धतीने ही लढाई लढत आहोत. पण गरज पडली तर मायमराठीसाठी मराठी माणूस रस्त्यावर उतरून लढू शकतो, हे दाखवून दिले आहे. मायमराठीच्या अस्तित्वासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई पण लढायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. शहाजी महाराजांच्या समाधीसाठी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांच्या कर्नाटकातील समाधीची अवस्था फार वाईट आणि बिकट आहे. त्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. कोट्यवधी रपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आपण बांधतो. पण त्यांच्या पित्याच्या समाधीची दुरवस्था होणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.