प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – रहिमतपूर नगरपालिकेची निवडणूक होऊन नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. वैशाली निलेश माने यांची निवड झाली आहे. वीस नगरसेवक असलेल्या पालिकेत भाजपचे ९ नगरसेवक निवडून आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळानुसार उपनगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्याच पारड्यात जाणार आहे. परंतु नगराध्यक्षपदाबरोबरच उपनगराध्यक्ष पद सुद्धा भाजपकडेच राहावे यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांचा नगरपालिकेत पराभव झाला असून तब्बल १३ नगरसेवक पहिल्यांदाच पालिकेत प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात झाला आहे. राष्ट्रवादीच्या सौ. नंदना माने यांचा अल्पमताने पराभव झाला .परंतु 11 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक आहेत.नगराध्यक्ष पदाची सूत्रे सौ वैशाली माने यांनी घेतल्यानंतर लगेचच उपनगराध्यक्षपद व विशेष समित्यांची सभापती पदांची निवड जाहीर होईल. नगरसेवक व नगराध्यक्षांचे एक मत विचारात धरून भाजप कडे सध्या दहा मते आहे तर राष्ट्रवादी शिवसेना युतीकडे 11 मते आहेत. यामुळे उपनगराध्यक्ष व सभापती निवडीत राष्ट्रवादी व शिवसेना युती बाजी मारणार असल्याचे चित्र समोर आहे. तर दुसरीकडे भाजपनेही ही पदे आपल्याकडेच राहावी यासाठी सत्तेची गोळा बेरीज सुरू केली आहे. राष्ट्रवादी शिवसेना युतीतील एक जरी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्यास समान बलाबल होऊन नगराध्यक्षांना अधिकच्या एक मताचा अधिकार असल्याने उपनगराध्यक्ष पदा सहित सर्व सभापती सभापती पदे आपल्याच भाजपच्या पारड्यात येऊ शकतात. यासाठी राष्ट्रवादी शिवसेना युतीतील एकातरी नगरसेवकाचे मतपरिवर्तन करण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा रहिमतपूरमध्ये सुरू झाली आहे . सुनील माने व वासुदेव माने यांचे कडून नगराध्यक्षपद अल्पमताने हुकले तरी पालिकेची सत्ता ताब्यात राहण्यासाठी एकजुटीचे प्रयत्न राहणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी शिवसेना युतीतील नेतेमंडळी व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोपी राहणार आहे. यासाठी सुनील माने व वासुदेव माने यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे .