प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार (दि. १४) ते बुधवार (दि. २४ डिसेंबर) दरम्यान भरणाऱ्या यात्रेचा प्रारंभ आज (दि. १४) पालखी व झेंड्याच्या मिरवणुकीने होणार असल्याचे असल्याचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ यांनी सांगितले. सेवागिरी मंदिरात रविवारी सकाळी आठ वाजता श्री सेवागिरी महाराजांची समाधी व पालखीचे मठाधिपती, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थांच्या हस्ते विधीवत पूजन झाल्यावर झेंडा व पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी पुसेगाव परिसरातील विविध गावांतील भाविक, ग्रामस्थ व विविध शाळांचे विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक यात्रास्थळावरील ट्रस्ट कार्यालयाजवळ आल्यावर तेथे झेंड्याची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. झेंडा प्रतिष्ठापनेपासून दहा दिवस भरणाऱ्या या यात्रेला प्रारंभ होणार आहे. एसटीच्या जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा उद्यापासून सलग ११ दिवस भरणार आहे. महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांतून आठ ते नऊ लाख भाविक लोक या कालावधीत पुसेगावात येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार, दि. १८ डिसेंबर असून या दिवशी श्री सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे पुसेगाव येथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व कोरेगावच्या उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली. त्यानुसार पुसेगाव गावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीत दि. १४ ते दि. २४ डिसेंबर या कालावधीकरीता पुढीलप्रमाणे बदल केला आहे. पुसेगावातील शिवाजी चौकाच्या काही अंतरापर्यंत वडूज, फलटण, दहिवडी आणि साताराकडून येणाऱ्या जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसना वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. शिवाजी चौकालगतच्या सर्वच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांना ५०० मीटर परिसरात तसेच श्री सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आहे. दि १४ रोजी रात्री बारा वाजल्यापासून दि. २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल आहे. त्यानुसार सातारा बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहने नेर फाटा- नेर गाव- ललगुण- बुध- राजापूर- कुळकजाईमार्ग दहिवडीकडे जातील किंवा विसापूर फाटा विसापूर- जाखणगाव- खातगुण- कटगुण मार्गे दहिवडीकडे जातील. दहिवडी- सातारा जाणारी वाहने कटगुण, खातगुण, जाखणगावमार्गे विसापूर, विसापूर फाटामार्गे साताराकडे जातील किंवा पिंगळी चौकातून वडूज, चौकीचा आंबा, विसापूर फाटामार्गे साताराकडे जातील. वडूज ते फलटणकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता खटाव, जाखणगाव, विसापूर फाटा, नेर ललगुणमार्गे फलटणला जातील. तसेच फलटण ते वडूज बाजूकडे जाणारी वाहने, ललगुण, नेर गाव, विसापूर फाटा, जाखणगाव, खटाव मार्गाने जातील. या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५४ अन्वये कारवाईस पात्र राहतील, याची सर्व नागरिक आणि वाहन चालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.