प्रभात वृत्तसेवा फलटण – पुणे ते पंढरपूर महामार्गालगत असलेल्या फलटण तालुक्यातील काळज येथे एसटी बसेस थांबवण्याबाबत फलटण आगाराकडे वारंवार मागणी करुनही बसथांब्यावर बसेस थांबत नव्हत्या. याबाबत प्रवाशांच्या मागणीबाबत ‘दै. प्रभात’मध्ये वृत्त प्र्रसिध्द झाल्यानंतर आगार प्रमुख वाघमोडे यांनी या मार्गावरील सर्व बसेस काळज बसथांब्यावर थांबवण्याची सक्त सूचना केल्याने परिसरातील नागरिक, प्रवाशांना ‘दै. प्रभात’ला धन्यवाद व्यक्त केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, काळज, ता. फलटण हे पुणे-पंढरपूर महामार्गालगत वसलेले गाव. या गावातून काळज, तडवळे, डोंबाळवाडी, मुरूम, घाडगेमळा, नांदल व सासवड या गावातून असंख्य प्रवासी व विद्यार्थी प्रवास करत असतात. परंतु अनेक एस.टी. बसेस काळज या ठिकाणी थांबत नसल्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत होती. यासाठी काळजचे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील यांनी काळज येथे एसटी बस थांबवण्यात यावी या संदर्भात ग्रामपंचायतीचे मागणी पत्र दिले होते. परंतु याकडे फलटण आगाराकडून दुर्लक्ष होत होते.यासंदर्भात ‘दै. प्रभात’च्या माध्यमातून आवाज उठवल्य नंतर काळज, तडवळे, डोंबाळवाडी व पंचक्रोशीतील इतर गावातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची समक्ष भेट घेतली. सर्वांनी मिळून हा प्रश्न खासदार व आमदारांच्या समोर मांडला. त्यावेळी रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी त्वरित आगार प्रमुखांना फोन करून फलटण डेपोच्या सर्व गाड्या काळज येथे थांबवण्याच्या सूचना केल्या व आगार प्रमुख वाघमोडे यांनी सुद्धा याला अतिशय चांगला प्रतिसाद देत हा प्रश्न त्वरित सोडवला व डेपोतील या मार्गावरील सर्व वाहक-चालक यांना सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी तडवळे चे चेअरमन सिराजभाई शेख, अमोल खराडे, माजी उपसरपंच सचिनकुमार गाढवे, लक्ष्मण शिंदे, नंदकुमार गाढवे, सतीश गाढवे, संजय गाढवे, भीमराव गाढवे, विकी कुंभार, तुषार पिसाळ, धर्मेंद्र भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.