प्रभात वृत्तसेवा सातारा – युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे देण्यात येणारा चिरमुले पुरस्कार नाम फाउंडेशनला नाना पाटेकर यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.पुरस्कार संस्थेच्या वतीने नाना पाटेकर यांनी त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख व सन्मान चिन्ह असे आहे. नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेली संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत व त्यांना पुनः उभे राहण्यास मदत करते. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकर्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठीसुद्धा ही संस्था कार्यरत आहे. वंचित गावांमध्ये विकास आणि अशा लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या त्यांच्या 10 वर्षाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन 2024 चा ‘चिरमुले पुरस्कार’ संस्थेस देऊन गौरविण्यात आले.चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ. कै. मनमोहन सिंग, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, कै. रतन टाटा, कै. राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, गुलजार, डॉ.सायरस पूनावाला, डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर आदी व्यक्तिंना पुरस्काराने गौरविले आहे. पुरस्कार प्रदान करताना ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ. अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी तसेच आयडीबीआय ट्रस्टी तर्फे सौ. मानसी माचवे व सौ. मानसी पतकी व फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आणि इतर मान्यवर उपस्थित होते.