प्रभात वृत्तसेवा म्हसवड – भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पूजा विरकर तसेच विजयी नगरसेवक व नगरसेविकांचा नागरी सत्कार सोहळा म्हसवड नगरपरिषद सभागृहात उत्साहात झाला. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरवसोहळा झाला.कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षा पूजा विरकर, नवनियुक्त नगरसेवक विजय धट, चैताली शिंदे, सतीश मासाळ, सविता मासाळ, लखण लोखंडे, दिपाली शिंदे, माधुरी लोखंडे, अखिल काझी, श्रीदेवी पिसे, प्रज्योत कलढोणे, आकाश पानसांडे, स्नेहल सूर्यवंशी, प्रमिला ढाले, युवराज सूर्यवंशी, अरुणा गायकवाड, महावीर विरकर, पूनम विरकर, विजय बनगर, स्वाती बनगर, अभिषेक विरकर, यांचा ना. गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ना. जयकुमार गोरे म्हणाले, जनतेने भरभरून दिलेल्या आशिर्वादामुळेच मला विक्रमी मतांनी यश मिळाले. 2016 च्या पराभवानंतर मी म्हसवड नगरपालिकेत पाऊल ठेवणार नाही, गुलाल घेणार नाही, असे ठरवले होते. मात्र 21 चा ऐतिहासिक निकाल देत म्हसवडकरांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला. सामान्य कुटुंबातील, राजकीय वारसा नसलेली व्यक्ती नगराध्यक्षा झाली, हे लोकशाहीचे मोठे उदाहरण आहे.पुढे त्यांनी सांगितले, पाच वर्षे प्रामाणिकपणे शहराची सेवा करा. पदाचा गर्व न करता लोकांच्या प्रश्नांसाठी झटा. अनुभवी आणि तरुण नगरसेवकांनी एकत्र येऊन विकासाचे स्वप्न पूर्ण करावे. मोदीजींच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे.प्रस्तावना शिवाजीराव शिंदे यांनी करत या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे आहेत, असे गौरवोद्गार काढले. मंत्री गोरे यांचा फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास भाजपचे प्रदेश पदाधिकारी, स्थानिक नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ व शक्तिकेंद्र प्रमुख, महिला पदाधिकारी तसेच म्हसवड शहरातील नागरिक उपस्थित होते.