प्रभात वृत्तसेवा महाबळेश्वर – महाबळेश्वर मधे स्थानिक स्वराज्य संस्था २०२५ निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली असून महाबळेश्वर मधे एकूण ८३.२६ % इतके मतदान झाले आहे. शहरातील एकूण १२७०४ पैकी ५१२४ पुरुष तर ५४५३ महिला अशा एकूण १०५७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी येथील १० प्रभागां साठी एकूण १७ मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती. दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.महाबळेश्वर वासीयांनी मतदान प्रक्रिये मधे उत्स्फूर्त सहभाग घेऊन लोकशाहीचा उत्सव साजरा केला सकाळ पासून संथ गतीने चालले मतदान प्रक्रियेने दुपार नंतर चांगलाच वेग घेतला. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती गर्दी केली होती तर १ डिसेंबर रोजी होणारे मतदान प्रक्रिया २० तारखे पर्यंत पुढे गेल्याने बाहेर गाव हून आलेल्या मतदारांची निराशा झाली होती या मुळे २० तारखेला किती टक्के मतदान होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविण्या साठी मोठ्या संख्येने महाबळेश्वर मधे हजेरी लावलेली होती . तर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असुन नगराध्यक्ष पदाच्या ५ उमदेवारांबरोबर नगरसेवक पदाच्या ६७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मत पेट्यांमध्ये कैद झाले असून नगराध्यक्ष पदा बरोबर नगरसेवक पदा करिता कोणत्या उमेदवारांना जनतेचा कौल मिळणार याचाकडे सर्वांचे लक्ष लागले असून २१ तारखेला सकाळी १० वाजता येथील गिरीस्थान शाळे मध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे .