प्रभात वृत्तसेवा मांढरदेव – मांढरदेवमध्ये मागील अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ तसेच भाविकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. यामुळे ग्रामस्थ, प्रवासी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मांढरदेवयाठिकाणी झुडपांचे तसेच गवताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक जंगली प्राण्यांना लपण्यासाठी जागा मिळते. म्हणून येथे मागील काही महिन्यांपासून घाटातून ये-जा करताना, माळरानावर व अनेक शेत-शिवारांमध्ये ग्रामस्थ व भाविकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील गावांमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेक लहान मुलांना तसेच पाळीव प्राण्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले असल्याच्या अनेक बातम्या दूरध्वनी वरून, वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्याचा वावर असलेल्या भागांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. त्यातच आता मांढरदेव परिसरामध्ये एक नाही, तर तीन-चार बिबट्यांचे त्यांच्या पिल्लांसह दर्शन होत असल्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच त्या रस्त्याने प्रवास करणार्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.मांढरदेव येथील पालना वस्तीवरील संतोष धायगुडे यांची मागच्याच आठवड्यामध्ये घराच्या पाठीमागे बांधलेली शेळी बिबट्याने मारली होती. त्याची तशी तक्रार देखील संबंधितांनी वन खात्याला कळविली होती. तरी देखील या विभागामार्फत यावर कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे संबंधित नुकसानग्रस्त शेतकर्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वन खात्याने याची दखल घेऊन यावर ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.