प्रभात वृत्तसेवा सातारा – सांगा आम्ही काय गुन्हा केला? अजूनही आमच्याकडे चोर, दरोडेखोर म्हणूनच का पाहिले जाते, आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले आहे? स्वतंत्र भारतात अजूनही आम्हाला गुलाम का बनवू पाहिले जाते अशी आर्त वेदना ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आज व्यक्त केली.निमित्त होते, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार सोहळ्याचे. या सोहळ्यात लक्ष्मण गायकवाड आणि ज्येष्ठ प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर यांचा आज (दि. ३) विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनिताराजे पवार, अमेरिकेचे खासदार व साहित्यिक श्रीनिवास ठाणेदार उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, भटके विमुक्त हे शिवरायांचे खरे मावळे आहेत. मी लेखक म्हणून त्यांच्या वेदनांना शब्द देण्याचे काम करतो. महाराष्ट्रात आम्हाला अजूनही स्वातंत्र्य नाही याची मात्र खंत वाटते. स्वतंत्र महाराष्ट्रात आमच्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद केलेली नाही. आज भटक्या विमुक्तांची लोकसंख्या ४ कोटी आहे व त्यात ४७ जाती आहेत. असे असताना आम्हाला संविधानाच्या बाहेर का ठेवले आहे. आमच्या सवलती का नाकारल्या आहेत हा आमचा खरा प्रश्न आहे. या प्रकरणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे तसे साहित्यक्षेत्रातही या शहराचे योगदान मोठे आहे. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासंदर्भात जी अपेक्षा लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली. त्या बाबतीत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले नक्की मार्ग काढू शकतात. कवीवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक जतन करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर नक्की पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.विश्वास पाटील म्हणाले, मराठीला प्रकाशकांची मोठी परंपरा लाभलेली आहे. ‘उचल्या’मधून गायकवाड यांनी मांडलेली वेदना अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे अशा दोन व्यक्तींचा सत्कार होणे महत्वाचे आहे.