प्रभात वृत्तसेवा कोयनानगर – आज भूकंपग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी भूकंपग्रस्तांच्या नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे दाखले, स्थलांतर नोंदी, जमीन- जुमल्याचे विवरण आणि पुनर्वसनाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज आता मोबाइलवर सहज तपासता येतील. भूकंपग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण, नोंदींचे अचूक व्यवस्थापन आणि भविष्यातील प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम प्रत्यक्षात आला असून कोयना विभागासाठी हो एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे. कार्यक्रमात प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर, उपकार्यकारी अभियंता किरण कानुगडे, उपअभियंता आशिष जाधव, मंडलाधिकारी संजय जंगम, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी सभापती राजाभाऊ शेलार, माजी सदस्य बबनराव कांबळे, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सरपंच शैलेंद्र शेलार, बाळा कदम, सत्यजित शेलार, भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, मनीष चौधरी, मनसेचे विभाग अध्यक्ष दयानंद नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनीही स्मृतिदिनात सहभाग नोंदवून भूकंपग्रस्तांसाठी आयोजित कार्यक्रमात आदरांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या माहितीफलक व छायाचित्र प्रदर्शनातून भूकंपाचा इतिहास, पुनर्वसन प्रवास व डिजिटायझेशन प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट झाले. क्यूआर कोड प्रणालीमुळे नोंदींची पडताळणी जलद व पारदर्शक होईल, नाजूक कागदपत्रांचे डिजिटल संरक्षण सुनिश्चित होईल आणि नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल. भूतकाळातील विनाशकारी आठवणी जरी ताज्या असल्या तरी, नोंदींच्या डीजिटायझेशनमुळे भूकंपग्रस्तांसाठी नवीन पाऊल उभे राहिले आहे, असा संदेश अधिकाऱ्यांनी दिला.