प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथील बाजारपेठेतून जाणार्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्री सेवागिरी महाराज मंदिराशेजारील येरळा नदीवरील पूल ते बाचल कॉर्नर रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा उद्या, दि. 24 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी 19 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार, सोमवार (दि. 24) ते 5 डिसेंबर या कालावधीत पुसेगावमधील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती सपोनि संदीप पोमण यांनी दिली. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला 14 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रेआधी नागरिक, भाविक आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुसेगावमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने पूर्ण केले जाणार आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष जाधव, सपोनि संदीप पोमण, प्रभारी सरपंच विशाल जाधव, बाचल कॉर्नरवरील जागामालक व मेघा इंजिनिअरिंगचे कर्मचारी यांची बैठक झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे येरळा नदीवरील पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने प्रवास करून, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोमण यांनी केले आहे. दरम्यान, सर्व बाधितांनी आपल्या जागा स्वतःहून मोकळ्या करून दिल्याबद्दल देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने रणधीर जाधव यांनी जागामालकांचे आभार मानले.