प्रभात वृत्तसेवा खटाव – पुरोगामी विचारांचा खटाव तालुक्यात राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. हा तालुकाच राष्ट्रवादी विचारांचा आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्ही एकदिलाने काम करुन पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देवू, असा विश्वास खटाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना प्रदीप विधाते यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या खटाव तालुकाध्यक्षपदी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांच्या हस्ते विधाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रदीप विधाते म्हणाले, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पोषक वातावरण आहे. आपल्या पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. दादा, आबा, काकांनी माझ्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून मोठा विश्वास दाखवला आहे. तालुक्यातील नव्या, जुन्या सहाकाऱ्यांच्या सहकार्याने, सर्वांचा सम्नवय साधून पक्षाची यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधाते यांच्या निवडीनंतर खटावसह तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दादा, आबा, काकांनी आगामी निवडणूका ध्यानात घेऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधातेंची खटाव तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. नाही म्हटले तरी ना. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदेंनी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. सध्या वरिष्ठ पातळीवरील राजकारणात अनेक उलथापालथी होत असल्याने महायुतीतील घटकपक्ष आगामी निवडणूका जिल्ह्यात स्वबळावर लढणार आहेत. दादांची राष्ट्रवादी त्यासाठी निकाराचा जोर लावणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खटाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदीप विधातेंचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुनील माने, प्रा. अर्जुन खाडे, अनिल देसाई, पृथ्वीराज गोडसे, सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे, राजू कचरे, सागर साळुंखे, संतोष साळुंखे, संदीप मांडवे, भाग्यश्री भाग्यवंत आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. विधातेंच्या निवडीने खटावच्या राजकारणाला लिफ्ट मिळेल खटाव तालुक्यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी पक्षाच्या जिल्हा थिंक टॅंकमध्ये सहभागी असणाऱ्या आणि अनेक वेळा संघटनकौशल्याच्या जोरावर राजकारणात मुत्सद्देगीरी करणाऱ्या प्रदीप विधातेंकडे खटाव तालुक्याची जबाबदारी दिल्याने तालुक्याच्या राजकारणाला आणि दादांच्या राष्ट्रवादीला लिफ्ट मिळणार आहे.