Jaykumar Gore – माण-खटावचा दुष्काळ संपवण्याचा शब्द मी दिला होता आणि पाणी आणून, तो प्रत्यक्षात पाळला. फक्त आश्वासनांची भाषा नव्हे, तर कामातून राजकारण कसे केले जाते, हे मी दाखवून दिले आहे, असे ठणकावून सांगत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. अॅड. दिप्तीताई पिसाळ ह्या ग्रामविकास खात्याच्या बावधनच्या मंत्री आहेत, असेही ते म्हणाले. बावधन जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार अॅड. दिप्ती पिसाळ, गणाचे उमेदवार सचिन भोसले आणि शेंदूरजणे गणाच्या उमेदवार अनिता कोंढाळकर यांच्या प्रचारार्थ बावधन येथे झालेल्या सभेत मंत्री गोरे बोलत होते. माजी आमदार मदन भोसले, माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, रोहिदास पिसाळ, भाजप तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, अॅड. विश्वजित मोहिते, जितूभैय्या पिसाळ, विजयसिंह पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.मंत्री गोरे म्हणाले, वाई-खंडाळा परिसरात पाणी नेऊन, दुष्काळ संपवला जात असताना, इथले तथाकथित लोकप्रतिनिधी काय करत होते, हा प्रश्न जनतेने विचारावा. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या ग्रामविकास खात्याच्या अखत्यारित आहेत. या भागाच्या विकासासाठी पत्र माझ्या टेबलवर येते आणि मंजुरीही इथूनच मिळते. त्यामुळे बावधन गटाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे. देवाभाऊंनी महिलांचा सन्मान केवळ भाषणात नाही, तर थेट बँक खात्यांवर मदत देऊन केला आहे. बहिणींचा सन्मान करणार्या नेतृत्वाला विसरू नका. युवक बाहेर पडला, तर कोणताही निकाल बदलू शकतो. सातारा जिल्हा परिषद या निवडणुकीनंतर सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकेल. यात शंका नाही. मात्र, जिल्हा परिषदेत बावधनचा सदस्य नसणे, ही चूक होऊ देऊ नका, असे आवाहन करत, त्यांनी तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याची हाक दिली. विजयसिंह पिसाळ यांनी स्वागत केले. शशिकांत पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. दीपक ननावरे यांनी आभार मानले. सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. बावधनची निवडणूक ही अस्मितेची लढाई ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर बावधनच्या अस्मितेची परीक्षा आहे. तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या राजकारणावर सातत्याने प्रभाव ठेवणार्या बावधनच्या लेकीची ताकद आजही आहे. ती ताकद अबाधित ठेवण्याची जबाबदारी गावकर्यांवर आहे. एकजूट हा बावधनचा स्वभाव आहे. विकास, सन्मान आणि भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, जनतेने मतभेद बाजूला ठेवत, बावधनच्या लेकीसाठी एकदिलाने चांगभले करणे, गरजेच आहे, असेही मंत्री गोरे म्हणाले.