प्रभात वृत्तसेवा गोंदवले – मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी मंदिरात आज भक्तीमय वातावरण पहायला मिळाले. विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.सकाळ जसजशी पुढे सरकत गेली तसतशी भाविकांची संख्या वाढत गेली आणि मंदिर परिसर महिलांची भाविकांनी फुलून गेला. मकर संक्रांतीच्या दिवशी श्रींच्या समाधीवर दर्शन घेणे, ओटी भरणे ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. याच परंपरेनुसार सुवासिनी व ज्येष्ठ महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, नथ, हिरवे चुडे, कुंकू लावून मंदिरात हजेरी लावली होती.मंदिर परिसरात महिलांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पाडला. तिळ, गूळ, साखर, फुटाणे, नारळ, फळे, फुले व सवाष्णींसाठी दिले जाणारे वाण अर्पण करण्यात आले. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” म्हणत महिलांनी एकमेकींना तिळगूळ वाटत आपुलकी व सौहार्द जपले. अनेक महिलांनी उपवास करून दर्शन घेतले तसेच भजन, नामस्मरण व श्रीरामनाम जप केला. गोंदवलेसह विविध गावांमधून तसेच परजिल्ह्यातूनही महिला भाविकांची गर्दी झाली होती. काही महिला पहाटेपासूनच मंदिरात दाखल झाल्या होत्या. मंदिराच्या प्रांगणात दिवसभर ‘श्री राम जय राम जय जय राम’ या नामघोषाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन समाधी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. स्वच्छता, पिण्याचे पाणी व प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंदिर परिसरात शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. तिळगूळ वाटत श्रींच्या चरणी प्रार्थना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गोंदवले नगरीत केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सौहार्दाचेही दर्शन घडले. महिलांनी एकत्र येऊन सण साजरा केल्याने परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला. अनेक महिलांनी घरातील सुख-शांती, पतीचे आरोग्य, मुलांचे उज्ज्वल भविष्य तसेच चांगल्या पावसासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. श्रींच्या समाधी मंदिरात झालेल्या या भक्तीमय गर्दीमुळे गोंदवले परिसर संपूर्ण दिवस श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारावून गेला.