प्रभात वृत्तसेवा दहिवडी – सामाजिक वातावरण बिघडवणार्या मिरवणूकीतील डीजेवर आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून डीजे वाजविण्यास बंदी घालण्याचा विषय ग्रामसभेसमोर आणला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात आंधळी ग्रामपंचायतीचा डीजे बंदीचा अभिनव निर्णय माण तालुक्यात चर्चेत आला आहे. ध्वनी प्रदुषण, मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाज, शारीरिक आणि मानसिक घातक दुष्परिणाम, नाचताना केले जाणारे अश्लील हावभाव, वादावादी यामुळे डिजेचा आवाज धोकादायक ठरू लागला आहे. सामाजिक वातावरण बिघडवणार्या मिरवणुकीतील डीजेवर यापुढे आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. याच ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनचे कायमस्वरूपी सहकार्य मिळावे, अशी ग्रामपंचायतीने विनंती करत हा ठराव कायदेशीर चौकटीत बसवून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच दादासाहेब काळे यांनी सांगितले. जगभर डिजिटल युगात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन होत असून प्रत्येकाला त्यासोबत रहावे लागणार आहे. यासाठी आंधळी ग्रामपंचायतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेचा सर्वांगीण विकास करत सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट दुसर्या क्रमांकाचा लौकिक पटकाविला आहे. आता गावातील वेळोवेळी वातावरण बिघडणार्या डीजे वाजविण्यास बंदी घालण्याचा विषय ग्रामसभेसमोर अनेकांनी चर्चेत आणला. यावर डीजेच्या आवाजाने सामाजिक वातावरण बिघडत असून होणारे घातक दुष्परिणाम यावर साधकबाधक चर्चा झाली. अखेर सर्वानुमते आंधळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही कार्यक्रमात डिजे वाजविण्यास बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी दहिवडी पोलीसांनी सहकार्य करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता आंधळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत डीजेला कायमस्वरुपी नो एंट्री असणार आहे.