प्रभात वृत्तसेवा सातारा – नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आराखडा मंजूर होवून आणि रेकॉर्डब्रेक कमी कालावधीत निधी मिळून कामही सुरु झाले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीला सार्थ कार्य करुन दाखवले आहे. आमच्या जयाभाऊंनी ही जादू केली आहे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. जयकुमार गोरे यांचे कौतुक केले. नायगाव येथे आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, अधिकारी आणि राज्यभरातून आलेल्या महिला भगिनी उपस्थित होत्या.मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या कामाची घोषणा करणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे मात्र ती घोषणा आमलात आणणे संबंधित मंत्र्यांचे काम असते. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आम्ही विचारात घेतल्यानंतर या स्मारकाची जबाबदारी आता तुमच्याकडे दिली असे मी आमच्या जयकुमार भाऊंना सांगितले होते. मला सांगायला आनंद होतोय की जयाभाऊंनीही रेकॉर्ड स्पीडने या स्मारकासाठीची सर्व कामे पूर्ण केली. मी, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा त्यांच्या पाठिशी होतो. महाराष्ट्रात असे पहिल्यांदा झाले असेल कि स्मारकाची घोषणा केल्यानंतर एक वर्षाच्या आत जागाही मिळाली, आराखडा तयार झाला, आराखडा मंजूर झाला, टेंडरही निघाले आणि कामही सुरु झाले. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. मला हे मान्य करावे लागेल की खऱ्या अर्थाने ही जादू आमच्या जयाभाऊंनी करुन दाखवली आहे. आम्ही ग्रामविकासमंत्री म्हणून जयाभाऊंना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला सार्थ कार्य त्यांनी करुन दाखवले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. आषाढी वारी नियोजन आणि समृद्ध पंचायराज अभियानाचेही कौतुक ग्रामविकासमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीदरम्यान केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. जयकुमार गोरे यांनी वारी नियोजनात नवीन बेंचमार्क केल्याचे ते म्हणाले होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचेही फडणवीस यांनी अनेकदा कौतुक करुन ना. जयाभाऊंची पाठ थोपटली आहे.