पाचगणी : पाचगणी शहरात कोकेन तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून तब्बल १० संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कोकेन सदृश अंमली पदार्थ, दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना १७ डिसेंबर रोजी विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घाटजाई मंदिर परिसरात संशयित इसम कोकेन विक्रीसाठी थांबलेला आहे. संशयिताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याने निळ्या रंगाची पँट व पिवळसर रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे (वाई विभाग) यांना कळवली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असल्याने त्यांची मदत घेत मध्यरात्री छापा टाकला. छाप्यादरम्यान विस्टा ग्रॅन्ड सोसायटीतील इस्टेला १ ए बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभी असलेली पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपीड कार (MH 02 DN 0259) तपासली असता त्यात पाच जण बसलेले आढळून आले. त्याच ठिकाणी एम.जी. हेक्टर कार (MH 01 DK 8802) मधून आणखी पाच जण मिळून आले. अशा प्रकारे एकूण १० संशयित पोलिसांच्या ताब्यात आले. अंगझडतीमध्ये संशयितांकडे ५ लाख रुपये किमतीचे कोकेन सदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल फोन असा मुद्देमाल सापडला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४२ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयितांनी चौकशीत सदर कोकेन पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३०५/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(घ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा) करीत आहेत.