प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वाहतूक वळवण्यात आली आहे. हा बदल आज शनिवारी सकाळपासून लागू करण्यात आला. परंतु, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील कोंडीचा भार कमी करताना आता अंजठा चौकातील कोंडी वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहरातील बॉम्बे रेस्टाँरंट चौकात पुण्याकडू येणारी वाहने, पोवई नाका जिल्हा परिषद मार्गे येणारी वाहने, कोरेगाव बाजूने येणारी वाहने, वाढे फाटा मार्गे येणारी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल फर्नसमोर सेवा रस्त्यावर संगम माहुलीच्या विवाहितेचा अपघाती मृत्यू झाला. या अपघाताने प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे दाखवून दिले. यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांचे होणारे पार्किंग, वाढती वाहनांची संख्या, विरुद्ध दिशेने वाहनांचा प्रवेश घातक ठरत आहे, हे लक्षात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित यादव यांनी वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल केला आहे. कोरेगाव मार्गाने येणारी सर्व वाहतूक बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून शहरात प्रवेश करत होती. ती वाहतूक पेट्रोल पंपासमोरील पुलाखालून शहरात प्रवेश करणार आहे. अशीच जिल्हा परिषद मार्ग येणारी वाहतूक पुलाखालून उजव्या दिशेने वळवण्यात आली आहे. यामुळे चौकात होणारे क्रॉसिंग बॅरिकेटस लावून बंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासून हा बदल लागू करण्यात आला आहे. या निर्णयाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतूकीवरचा ताण होणार का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतूक वळवली असली तरी पुढे अजंठा चौकात याच वाहतूकीचा ताण वाढणार असल्याचे चित्र आज दिसत होते. दोन्ही सेवा रस्त्यावरून विरोधी दिशेने येण्यास मनाई असल्याने बाँम्बे रेस्टारंट चौक ते अंजठा चौक आणि अंजठा चौक ते बाँम्बे रेस्टारंट चौकअसा फेरा वाढणार आहे. देगाव फाट्याकडून चढाने येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. यामुळेे या चौकात वाहतूक नियंत्रण करण्याचे व्यवस्थापनही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नो पार्किंग झोन लागू बॉम्बे रेस्टॉरंट चौकालगत असलेल्या सेवा रस्त्यावर अवजड वाहनांसह, दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. अनेक वेळा वाहतूक पोलिसांकडून या वाहनधारकांना सूचना करण्यात येतात. त्यांच्यावर कारवाईही केली जाते. मात्र, नियम मोडण्यात हे वाहनधारक पुढेच असतात. ही बाब लक्षात घेता दोन्ही सेवा रस्त्यालगत वाहने लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.