Ladki Bahin Yojana – काही प्रश्नांची उत्तरे चुकल्याने लाडकी बहिण योजनेची ई- केवायसी करुनही लाभार्थी महिलांना पैसे आले नाहीत. अशा 85 हजार महिला आहेत. त्यांना पुन्हा केवायसी करण्याची संधी सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत त्यांना केवायसी करता येणार आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ गरीब, गरजू, सर्वसामान्य महिलांनाच घेता यावा म्हणून सरकारने काही अटी लागू करत ई- केवायसी करणे बंधनकारक केले. ही केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. या मुदतीच्या आत जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी केवायसी केली. परंतु, केवायसी करताना माहितीत विचारलेले प्रश्न चुकले आणि जिल्हयातील 85 हजार महिलांना केवायसी करुनही लाभ मिळाला नाही. या महिलांनी शासकीय कार्यालयात जाऊन चौकशी केली. फक्त सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात केवायसी करुन महिलांना लाभ मिळाला नाही. अनेकांना ही योजना बंद होणार असल्याची भीती वाटू लागली होती. मात्र, सरकारने केवायसी चुकलेल्या लाभार्थी महिलांना दिलासा देत पुन्हा केवायसीची प्रकिया सूरु केली आहे. ही माहिती कळताच महिलांनी आधार केंद्रात गर्दी केली आहे. त्यांना येत्या 31 मार्चपर्यंत केवायसी करण्यात येणार आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.