प्रभात वृत्तससेवा भुईंज – पुणे ते सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक एस आकाराच्या वळणावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने सात वाहनांना ठोकारले. यामध्ये कोणतीही जीवित हानी आणि जखमी झाले नाही. मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी उशिरा झाला.या अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. पोलिसांनी ट्रक चालक किशोर दमाजीभाई बुथ (लुनागड – गुजरात) यास ट्रकसहित ताब्यात घेतले आहे.याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, साताराहून पुण्याकडे जाणारा ट्रक खंबाटकी बोगद्यातून पुण्याकडे जात असताना एस वळणाच्या अलीकडील तीव्र उतारावर ट्रकचे (जीजे १४ झेड ००९३) ब्रेक निकामी झाल्याने, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव ट्रकने उतारावर एकूण सात गाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ट्रक चालक ट्रकसह पसार झाला. मात्र, पुढे काही अंतरावर जाऊन ट्रकचा रेडिएटर फुटल्याने तो थांबला. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले.दरम्यान या अपघातात वाहनांना पाठीमागून ठोकरल्याने सात वाहनांचे मोठे नुकसान झाले. महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या पुढील तीव्र उतारावर पाठीमागून जोरदार धडक बसल्याने वाहने अस्ताव्यस्त पडली होती. मात्र, या अपघातात जीवित हानी झाली नाही. वाहन चालक किरकोळ जखमी झाले.यातील बहुसंख्य वाहने पुणे शहर आणि जिल्ह्यातील आहेत. यामुळे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अस्ताव्यस्त पडलेली वाहने बाजूला केल्यानंतर रात्री वाहतूक सुरळीत सुरू झाली. या घटनेची नोंद पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी उशिरा झाली आहे.