प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या, अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या रहिमतपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून रहिमतपूर शहरात कमळ फुलले आहे. या निवडणूकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वैशाली निलेश माने या 55 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 6396 मते मिळाली. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सौ. नंदना सुनील माने यांना 6341 मतावर समाधान मानावे लागले.नगरपालिकेत सत्तांतर झाल्याने सुनील माने यांची पंचवीस वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वैशाली निलेश माने व नगरसेवक पदाच्या 9 जागा, तर राष्ट्रवादीला नगरसेवक पदाच्या 9 जागा व शिवसेनेला नगरसेवक पदाच्या 2 जागा मिळाल्या आहेत. रहिमतपूर पालिकेतील 10 प्रभागातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग 1 – सौ. काजल गणेश घोलप 489 (राष्ट्रवादी), केतन आनंदराव माने 475 (राष्ट्रवादी), प्रभाग 2 – सौ. भाग्यश्री अशोक शेरकर 806 (भाजप), निलेश संपतराव माने 809 (भाजप), प्रभाग 3 – विद्याधर शंकर बाजारे 760 (शिवसेना), सौ. ज्योती उत्कर्ष माने 717 (शिवसेना) प्रभाग 4 – सौ. काजल नवनाथ माने 793 (राष्ट्रवादी), मयुरेश सुनील माने 799 (भाजप), प्रभाग 5 – सौ. हसिना असिफ डांगे 827 (राष्ट्रवादी), अमर शिवाजी काटे 844 (राष्ट्रवादी) प्रभाग 6 – नाना एकनाथ राऊत 826 (भाजप), सौ. वनिता सतिश भोसले 805 (भाजप), प्रभाग 7 – सुरज अनिल गायकवाड 888 (भाजप), सौ. किरण तुषार चव्हाण 935 (भाजप), प्रभाग 8 – सौ. मेघा आनंदा कोरे 690 (राष्ट्रवादी), राजेश भिमराव कदम 701 (राष्ट्रवादी), प्रभाग 9 – योगिता विजय लोहार 445 (भाजप), रणजित शिवाजी माने 472 (भाजप), प्रभाग 10 – आरजू इरशाद आतार 599 (राष्ट्रवादी), विपुल भिकोबा साळुंखे 637 (राष्ट्रवादी). निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संगमेश कोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश चव्हाण यांनी मतमोजणीचे काम पाहिले. रहिमतपूरचे पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निकालानंतर विजयी उमेदवारांची रहिमतपूर शहरातून गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महिला, नागरीक, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपच्या सुक्ष्म नियोजनाचा विजय निवडणूक जाहीर झाल्यापासून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले, निवडूक प्रभारी सुनील काटकर, धैर्यशील कदम, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. हा विजय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा व मतदरांनी केलेल्या परिवर्तनचा विजय आहे. या विजयामुळे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची 25 वर्षाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.