संजय पाटील कराड – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात असलेल्या भालेकरवाडी येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला चढवला. सुदैवाने महिला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली. वृद्धेला किरकोळ जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालन खाशाबा भालेकर (वय ६५) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील भालेकरवाडी येथील मालन भालेकर या मंगळवारी सकाळी गावानजीकच्या शिवारात जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या गवत कापत असताना अचानक गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. मालन भालेकर यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी जखमी मालन भालेकर यांना उपचारार्थ ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.