प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – वडूज-पुसेगाव रस्त्यावर खातगुण फाटा येथे मंगळवारी (दि. 13) सकाळी ट्रॅक्टर आणि मोटारसायकलच्या अपघातात प्रथमेश बाळू यलमारे (वय 23, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र सुरेश गाडेकर (वय 21, रा. लिंबागणेश, जि. बीड) याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, प्रथमेश यलमारे हा हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-13-डीआर-9397) वरून मंगळवारी (दि. 13) सकाळी 8 च्या सुमारास वडूजकडून पुसेगावच्या दिशेने जात होता. खातगुण फाट्याजवळ समोरून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने (एमएच-23-बीएन-1026) मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात प्रथमेशचा मृत्यू झाला. त्याचा मेहुणा अतुल रामचंद्र यलमारे (वय 35, रा. वडूज) यांनी फिर्याद दिली असून, हवालदार तात्यासाहेब ढोले तपास करत आहेत.