प्रभात वृत्तसेवा वाठार स्टेशन – लोणंद ते सातारा मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) हद्दीत झालेल्या भीषण अपघातात गणेश भीमराव खोसे (वय 34, रा. जळगाव ता.गेवराई जि. बीड; सध्या रा. बेलवडी फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला हमाल गंभीर जखमी झाला. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा मार्गावर दि. 19 रोजी सकाळी वाठार स्टेशन बाजूकडून भरधाव वेगात साताराच्या दिशेने निघालेला टेम्पो (एमएच 16 डीपी 3326) पिंपोडे खुर्द हद्दीत आल्यानंतर येथील दोस्ती ढाब्याजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पलटी झाला. अपघातात चालक गणेश खोसे याचा जागीच मृत्यू झाला, हमाल सुधाकर मोतीराम गिरे (वय 42, रा. सोनरवास पो. बागराबदी ता. मालेगाव जि. वाशीम; सध्या रा. बेलवडी फाटा ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) गंभीर जखमी झाला. सुधाकर गिरे यांनी वाठार पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली. हवालदार गिरी तपास करीत आहेत.