– अभय कुलकर्णी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावरील टेरिफ शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणल्याचे जाहीर केले आहे. तथापि, भारत रशियाकडून तेलखरेदी बंद करून व्हेनेझुएलाकडून तेल घेणार असल्याचे म्हटले आहे. भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील राजनैतिक संबंध 1959 मध्ये प्रस्थापित झाले, परंतु खर्या अर्थाने उभय देशांतील ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य 2005 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या भारत दौर्याने सुदृढ झाले. या भेटीदरम्यान ओएनजीसी सारख्या भारतीय कंपन्यांना व्हेनेझुएलातील तेल क्षेत्रांत गुंतवणुकीचे अधिकार मिळाले. 2012 पर्यंत व्हेनेझुएला भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला होता. भारताच्या अत्याधुनिक रिफायनरीज, विशेषतः रिलायन्सची जामनगर येथील रिफायनरी, व्हेनेझुएलाच्या ‘जड’ तेलावर प्रक्रिया करण्यासाठी विशेषतः सक्षम आहे. 2019 पासून अमेरिकेने व्हेनेझुएलावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे या संबंधांना ओहोटी लागली. अमेरिकेच्या दबावाखाली आणि निर्बंधांच्या भीतीपोटी भारताला व्हेनेझुएलातून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणावर कमी करावी लागली. 2020 पर्यंत ही आयात नगण्य पातळीवर आली होती. ओएनजीसी विदेश सारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश आणि कच्च्या तेलाचा पुरवठाही रोखला गेला होता. यामुळे भारताला आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशिया आणि मध्य आशियातील देशांकडे वळावे लागले. आता भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे व्हेनेझुएला पुन्हा एकदा भारताच्या ऊर्जा नकाशावर केंद्रस्थानी आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या बदल्यात व्हेनेझुएलातून तेल आयात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारताची व्हेनेझुएलातून होणारी आयात एकूण तेलाच्या केवळ 0.3% होती, जी आता या नव्या धोरणामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिफायनरीज आता या ‘हेवी क्रूड’वर प्रक्रिया करण्यासाठी सज्ज होत आहेत. एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार, जर भारताने रशियाच्या तेलाऐवजी व्हेनेझुएलाच्या तेलाला प्राधान्य दिले, तर दरवर्षी सुमारे 3 अब्ज डॉलरची बचत होऊ शकते. जरी व्हेनेझुएला भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने वाहतूक खर्च जास्त असला, तरी तेथून मिळणारी मोठी सवलत हा खर्च भरून काढण्यास पुरेशी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बदललेली जागतिक समीकरणे आणि अमेरिकेची नवी टॅरिफ नीती यामुळे भारत-व्हेनेझुएला तेल संबंध आता केवळ व्यावसायिक न राहता ते धोरणात्मक बनले आहेत. भारत आता रशिया आणि व्हेनेझुएला या दोन महत्त्वाच्या तेल पुरवठादारांच्या केंद्रस्थानी उभा आहे. रशिया हा भारताचा परंपरागत आणि जवळचा मित्र मानला जातो, तर व्हेनेझुएला हा राजकीय दृष्टिकोनातून आता एक महत्त्वाचा पर्याय म्हणून समोर येत आहे. तेलाच्या दृष्टीने विचार करता रशिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील सर्वात मोठा फरक हा अंतराचा आणि वाहतुकीसाठी लागणार्या वेळेचा आहे. रशियाची भारताशी असलेली भौगोलिक जवळीक ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. व्लादिवोस्तोक या रशियाच्या पूर्व भागातून निघणारे तेल टँकर्स अवघ्या 24 दिवसांत भारतीय बंदरांवर पोहोचतात. सुएझ कालव्यामार्गे येणार्या तेलाला साधारण 35 ते 40 दिवस लागतात. याउलट, व्हेनेझुएलातून येणारे कच्चे तेल अटलांटिक आणि हिंदी महासागर ओलांडून भारतात पोहोचण्यासाठी किमान 45 ते 50 दिवस लागतात. म्हणजेच, रशियाच्या तुलनेत व्हेनेझुएलातून तेल येण्यासाठी दुप्पट वेळ खर्ची पडतो. यामुळे वाहतूक खर्चातही वाढ होते. रशियाकडून होणारी तेल आयात प्रामुख्याने मध्यम आकाराच्या ‘एफ्रामॅक्स’ किंवा ‘सुएझमॅक्स’ टँकर्सद्वारे केली जाते, ज्यांची क्षमता 7 ते 10 लाख बॅरल असते. कमी अंतर असल्यामुळे या टँकर्सची ये-जा सतत सुरू राहते. मात्र, व्हेनेझुएला हे अत्यंत दूर असल्यामुळे तेथून तेल आणण्यासाठी ‘व्हेरी लार्ज क्रूड कॅरिअर्स’ या अवाढव्य टँकर्सचा वापर केला जातो. एका ‘व्हीएलसीसी’ टँकरमध्ये सुमारे 20 लाख बॅरल तेल सामावू शकते. याचा अर्थ असा की, व्हेनेझुएलाचे टँकर उशिरा येत असले, तरी ते रशियाच्या दोन टँकर्स इतके तेल एकाच फेरीत भारतात आणू शकतात. तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत रशिया आणि व्हेनेझुएलाच्या तेलात मोठा तांत्रिक फरक आहे. रशियाचे तेल हे ‘लाइट अँड स्वीट’ प्रकारात मोडते. यामध्ये अशुद्धता कमी असल्यामुळे त्यापासून पेट्रोल, डीझेल आणि विमानाचे इंधन तयार करणे सोपे आणि स्वस्त पडते. याउलट, व्हेनेझुएलाचे तेल हे ‘हेवी’ आणि अधिक चिकट असते. यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे शुद्धीकरण करणे अधिक गुंतागुंतीचे असते. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी यांसारख्या भारतीय कंपन्यांनी आपल्या रिफायनरीजमध्ये अशा प्रकारच्या जड तेलावर प्रक्रिया करण्यासाठी विशेष यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे अशा रिफायनरीजसाठी स्वस्त दरात मिळणारे व्हेनेझुएलाचे तेल अधिक फायदेशीर ठरू शकते. भारतातील विविध बंदरांवर या दोन देशांच्या तेलाचे आगमन होते. रशियाचे तेल प्रामुख्याने गुजरातमधील वाडीनार बंदरावर (नायरा एनर्जीसाठी) आणि ओडिशामधील पारादीप बंदरावर (इंडियन ऑइलसाठी) उतरवले जाते. तर, व्हेनेझुएलाचे जड तेल प्रामुख्याने रिलायन्सच्या मालकीच्या सिक्का (गुजरात) बंदरावर उतरवले जाते, जिथे अत्याधुनिक शुद्धीकरण प्रकल्पांची सोय आहे. अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्या बदल्यात रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची अट ठेवली आहे. तज्ज्ञांच्या मते, रशियाचे तेल स्वस्त आणि लवकर उपलब्ध होत असले तरी, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारताला होणारा आर्थिक फायदा हा तेलाच्या वाहतूक खर्चापेक्षा कित्येक पटीने जास्त असू शकतो. टेक्सटाइल, माहिती तंत्रज्ञान आणि पोलाद यांसारख्या क्षेत्रातील भारताची निर्यात अमेरिकेत वाढण्याची शक्यता आहे. भारताने आता आपल्या तेल आयातीमध्ये विविधता आणण्यास सुरुवात केली असून रशियाऐवजी व्हेनेझुएला आणि पश्चिम आशियातील देशांकडे वळणे हा धोरणात्मक भाग असला तरी, अमेरिकेने भारताला तेल कोणत्या देशाकडून घ्यावे आणि कोणत्या देशाचे तेल घेणे बंद करावे असे सांगणे आपल्यासाठी अभिमानास्पद नाही.