– डॉ. डी. एस. काटे Inflation : आतंरराष्ट्रीय आर्थिक तणावाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसायला लागला आहे. बचत करणे हे आता स्वप्नवत झाले असून महिनाभर काटकसरीने (Inflation) पगार कसा पुरेल याची तारेवरची कसरत सुरू झाली असून सर्वसामान्यांचा जीव रडकुंडीला आला आहे आणि महागाई त्यांना वाकुल्या दाखवत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण या देशातील युद्धामुळे जागतिक बाजारामध्ये (Inflation) विपरीत परिणाम समोर आले. त्याचबरोबर जगभर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे युद्ध नक्कीच ‘व्यापार युद्ध’ आहे, असे वाटू लागलं आहे. आणि याची सुरुवात अमेरिकेपासूनच झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की, Money was never a big motivation for me, Except as a way to keep score. The real excitement is playing the game. (पैसा हा माझ्यासाठी कधीच मोठी प्रेरणा नव्हता, फक्त स्कोअर मोजण्याचं साधन म्हणून होता. खरी मजा खेळ खेळण्यात आहे.) जगात सर्वात मोठी व सधन अर्थव्यवस्था असणार्या अमेरिकेचे अध्यक्ष यांची ही वृत्ती असेल तर जगात अस्थिरता पाहणे ही एक त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना मजा वाटते. अशा अस्थिर वातावरणामुळे (Inflation) संकेत मिळतो की पुढे जगात असेच चालू राहणार. वेगाने वाढणारी देशाची अर्थव्यवस्था व विकसनशील देश म्हणून जगासमोर आपला चेहरा असणार्या आपल्या देशात सध्या महागाईचा भडका उडतोय. अशा युद्धमय परिस्थितीमुळे सर्वाधिक नुकसान आपल्या देशाचे होत आहे. Inflation भारत देशाची अमेरिका, इराण, इस्राइल देशात होणारी आयात निर्यात तसेच या मार्गे होणारी आयात निर्यात बंद असल्याने सर्वसाधारणपणे जगातला व्यापार ठप्प झाल्याने दोन ते तीन वर्षे आर्थिक गणित मागे जाईल, असा अंदाज व्यक्त होतोय. कृषी क्षेत्र विकासाच्या हिश्श्यामध्ये अत्यंत पीछाडीवर आहे. साधारण एकूण जीडीपीच्या 18 टक्के हिस्सा फक्त कृषी क्षेत्राचा आहे. पण आधुनिक तंत्रज्ञान व शेती करण्याची पद्धत बदलल्याने आपल्या देशाची कृषी उत्पन्नाची निर्यात दिवसेंदिवस वाढत गेली. पण दोन ते तीन महिन्यांपासून भारतातून बाहेर जाणारे फळे, अन्नधान्य, तांदूळ, कृषी अनुरूप इतर साहित्य, हस्तकला, वस्तू याची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. निर्यातीमुळे बाहेरच्या देशातून डॉलर रूपाने आपणास चलन मिळते. त्याचबरोबर साधारणपणे भारतातील एक कोटी जनता या युद्धभूमीत नोकरी व व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडून येणारे देशातील चलन हेसुद्धा ठप्प आहे. पर्यायाने आपला रूपया घसरत चालला आहे. डॉलरच्या किमती वाढल्याने आपल्याला सर्वच गोष्टी महाग मिळतात. हा एक महागाईचा धागा आहे. युद्धाची अनिश्चितता त्याचबरोबर मरगळ लवकर दूर होईल असे दिसत नाही. मुख्य म्हणजे इंधनाचं विकासाशी घट्ट नातं आहे. अर्थात, जेवढा विकास जास्त तेवढा ऊर्जा वापर जास्त! नेमकं आपल्याला 90% इंधन बाहेरच्या देशातून खरेदी करावे लागत असल्याने, मुख्य चलन आपले त्यामध्ये गुंतले जाते. कच्च्या इंधनाचे भावही दुप्पट झालेले आहेत. थोड्याच दिवसांत पेट्रोल व डीझेलचे भावसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज आहे. इंधनाचे भाव वाढले की सर्व उत्पादित वस्तूचे भावसुद्धा वाढतात. मग महागाईस खतपाणी पुरवले जाते. कच्च्या मालाच्याही किमती वाढतात! आज माल वाहतूक त्याचबरोबर इतर सेवा यांच्या किमती साधारण दीडपटीने दोन ते तीन महिन्यांत वाढलेल्या दिसतात. या परिस्थितीचे परिणाम म्हणजे मानवी निर्देशांक घसरत आहे. भारतीय नागरिकांची क्रयशक्ती अर्थात, खरेदी क्षमतासुद्धा कमी झाली असल्याने त्याचा परिणाम विकासदरावर होईल. भारताचा विकासदर 6% पर्यंत खाली येण्याचे संकेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानापर्यंत घसरू शकते असा अंदाज राष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. अर्थात, हा अंदाज खूपच लवकर प्रत्यक्षात आला. कारण भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. एकीकडे महागाई वाकुल्या दाखवत असताना असे अंदाज प्रत्यक्षात येणे धक्कादायक आहे. पुढील भयानक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आजच आपत्कालीन उपाय योजना सरकारकडून अपेक्षित आहे. तहान लागली म्हणजे विहीर खोदणे ही वृत्ती बंद करावी लागेल. इंधन ऊर्जेस नवीन पर्याय त्याचबरोबर इंधन अवलंबित्व कसे कमी करता येईल यावरही विचार मंथन होणे आवश्यक आहे. स्वदेशी वस्तू व सेवा यास प्राधान्यक्रम देऊन सरकारने चालना देणे गरजेचे आहे. नागरिकांनी येणारे पुढील धोके लक्षात घेता योग्य रीतीने खर्च करणे, येणार्या पैशाचे यथायोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कारण डोळे झाकून पैसा खर्च करण्याचे दिवस गेलेले आहेत. प्रत्येकाचा खिसा हा जागतिक अर्थव्यवस्था त्याचबरोबर जागतिक घडामोडीशी जोडलेला आहे याचे भान असावे. आगामी काळात महागाई किंवा मंदीमुळे आर्थिक स्थिरता कुठल्याही व्यवसायामध्ये राहून शाश्वत नफाच मिळेल, असे दिवस राहिलेले नाहीत. याची जाणीव ठेवून नागरिकांनी दक्ष राहावे.