Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘डॉ. तुकाराम रोंगटे यांचे साहित्य : एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र’ हा कार्यक्रम (दि. 21) उत्साहात संपन्न झाला. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या चर्चासत्रात विविध मान्यवर अभ्यासकांनी डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या साहित्यावर सखोल विचारमंथन केले. डॉ. संभाजी मलघे संपादित ‘तुकाराम रोंगटे यांचे साहित्य’ या पुस्तकाचे प्रकाशनही डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव सिताराम जोशी यांच्या ‘अधिकारी माणूस’ या आत्मकथनावर आधारित विशाल साळवे लिखित ‘अधिकारी माणूस : एक आकलन’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन अक्षरओवी प्रकाशनाच्या वतीने डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी करणारे विशाल साळवे यांनी सिताराम जोशी यांचे विचार व कार्य समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने हे संशोधनात्मक लेखन केले आहे. सिताराम जोशी हे निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी गोहे येथे ग्रामीण विकास, पेसा कायदा मार्गदर्शन शिबिरे, रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत आहेत. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. बाळासाहेब सोनवणे, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. राजाभाऊ भैलूमे, डॉ. उमेश सिरसट, डॉ. अनिल पवळ, महेंद्र भारती, डॉ. संजय मेस्त्री, शिवाजी कर्ले यांच्यासह साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.