Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या साहित्यावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र शनिवारी (दि. 21) चिंचवडगाव येथे उत्साहात पार पडले. चर्चासत्राचे उद्घाटन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. शिरीष लांडगे पाटील, प्राचार्य पांडुरंग भोसले, प्रा. प्रदीप पाटील, महेंद्रजी भारती आणि डॉ. तुकाराम रोंगटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सबनीस यांच्याच हस्ते डॉ. संभाजी मलघे संपादित ‘तुकाराम रोंगटे यांचे साहित्य’ आणि विशाल साळवे लिखित ‘अधिकारी माणूस : एक आकलन’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. बीजभाषक म्हणून डॉ. शिरीष लांडगे पाटील यांनी डॉ. रोंगटे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडापटू ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. १९९०च्या दशकात लेखनास सुरुवात करून डॉ. रोंगटे यांनी एकूण १२ ग्रंथांची निर्मिती केली असून ‘आदिवासींचेही बाबासाहेब’ या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासी समाजासाठीचे योगदान अधोरेखित केल्याचे डॉ. लांडगे यांनी नमूद केले. ‘साहित्यगोंदण’ हा ग्रंथ १९८४ ते १९९० या कालखंडातील आदिवासी साहित्य आणि समीक्षेचा प्रवाह समजून घेण्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, डॉ. रोंगटे यांनी डॉ. गोविंद गारे आणि डॉ. विनायक तुमराम यांच्या बरोबरीने आदिवासी साहित्यक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. संविधानिक संदर्भाने लिहिलेल्या ‘आदिवासींचेही बाबासाहेब’ या ग्रंथाने आदिवासी वैचारिक साहित्यात मोलाची भर घातल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या प्रगतीशिवाय देशाची परिपूर्ण प्रगती शक्य नसल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले. डॉ. रोंगटे यांचे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव दिघे हेही यावेळी उपस्थित होते व त्यांनी आपल्या शिष्याचा सन्मान पाहून आनंद व्यक्त केला. प्रा. प्रदीप पाटील यांनी संविधानाने आदिवासी आणि दलित समाजाला दिलेल्या बळाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यामुळेच डॉ. तुकाराम रोंगटे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होऊ शकले. चर्चासत्र एकूण चार सत्रांमध्ये विभागले होते. डॉ. राजाभाऊ भैलूमे, प्राचार्य डॉ. महादेव वाळूंज, डॉ. बाळासाहेब सोनवणे आणि डॉ. वसंत गावडे यांनी सत्राध्यक्षपद भूषविले. डॉ. कैलास महाले, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. विठ्ठल केदारी, प्रा. सुशील धसकटे, डॉ. अनिल वळवी, डॉ. मैजोद्दिन मुतवल्ली, यशवंत भांडकोळी, प्रा. शुभलक्ष्मी गावकर, डॉ. अतुल चौरे, डॉ. सुनील घनकुटे, डॉ. चिंतामण धिंदळे, डॉ. ज्ञानेश्वर तिखे आणि डॉ. योगेश शेळके यांनी आपले शोधनिबंध सादर करून डॉ. रोंगटे यांच्या साहित्यावर सखोल चर्चा केली. अखेरच्या सत्रात डॉ. नम्रता कदम आणि डॉ. हरेश शेळके यांनी लेखकाची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतून डॉ. रोंगटे यांची जीवन, शैक्षणिक आणि साहित्यिक वाटचाल उलगडण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. डॉ. उमेश सिरसट यांनी डॉ. रोंगटे यांचा परिचय करून दिला. दीपक म्हस्के, डॉ. अमोघसिद्ध चेंडके, डॉ. सुमित साळुंखे आणि डॉ. सदाशिव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अनिल पवळ यांनी आभार मानले. चर्चासत्रास प्राध्यापक, पीएचडी संशोधक, एम.ए. विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.